सारे प्रवासी घडीचे

स्मरणरंजनाचा हळवा कोपरा-

प्रगतीहोण्याला महत्वाकांक्षाकारणीभूत ठरत असेल, तर त्यापेक्षाही कितीतरी जास्त प्रमाणावर गरजकारणीभूत ठरत असल्याचं दिसून येईल. हीच प्रगती, स्वतःपाठोपाठ कितीतरी बऱ्यावाईट गोष्टी सोबत आणते. जवळच्या माणसांची ताटातूट, पर्यायहीन परिस्थितीत घडून येणारी विस्थापनं, अनेक गोष्टींच्या नवोदयामागे, अनेक गोष्टींचं अस्तंगत होत जाणं..होत राहणं- अशा त्या गोष्टी. काळानं कात टाकली, असं मोठ्या उत्साहानं म्हणतांना; ‘यासाऱ्याचा हिशेब मात्र आपसूकच मागं पडून जातो. आणि मग हाती उरतं ते फक्त आठवणींमध्ये परत-परत डोकावत राहणं…! जयवंत दळवींची सारे प्रवासी घडीचेही कादंबरी ऐकतांना, असंच काहीसं अनुभवता येतं. ‘स्नॉव्हेलच्या उपक्रमात स्थान मिळालेलं हे पुढचं बूक‘, जे आता ऑडीओ बूकबनून आलंय.

कोकणच्या भूमीवर घडणारी ही गोष्ट. गोष्ट म्हणण्यापेक्षा वेगवेगळ्या व्यक्तिचित्रांची एक मालिका म्हणणं अधिक उचित ठरावं. वरकरणी बघितलं तर, एक विनोदी; मनोरंजनात्मक कादंबरी- असं लेबल लगेच कुणीही लावेल, अशीच तिची जातकुळी. खूपसाऱ्या वल्लींचीजिवंत शब्दचित्र चितारलेली. परंतू जरा अधिक खोलात डोकावून बघितलं, तर जाणवेल की, हे फक्त विनोदाचंलेबल इथं पुरेसं नाहीये. किंबहुना सारे प्रवासी..’ अनेक ठिकाणी हास्यपेरणी करत असली, तरीही ते प्रत्येक हसू शेवटाकडे पोहचतांना आसूबनणं अटळ असल्याचं अनुभवायला येतं. एका विलक्षण रिक्त्ततेकडे आपल्याला लेखक घेऊन जातो.

शिक्षण-नोकरी च्या निमित्तानं कोकणातलं आपलं राहतं घर सोडून दूर शहराकडे- मुंबईत जायला लागलेल्या आपूची ही कहाणी. देशाला नुकतंच स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो काळ. साहेबाला परत त्याच्या मायदेशी धाडल्यानंतर, ‘संग्रामाचाउत्साह बऱ्यापैकी ओसरलेला. आता पुढे काय- अशा प्रश्नांत अडकलेली देशाची संपूर्ण एक पिढी. मग कोकणासारख्या (तेंव्हाही!) बव्हंशी अप्रगत असणाऱ्या भागांचं तरी वर्तमान आणि भविष्य काय वेगळं असणार? ‘पोटकुणाला स्वस्थ थोडंच बसू देतं? बघता बघता आसपासचा भवताल, त्यातही तरुण पिढी आपापलं नशीब आजमावायला बाहेर पडलेली. गावं या सळसळत्या उत्साहाविना ओस पडलेली. चार भिंतींना घर म्हणावं, यासाठी माणसं लागतात. तीच नाहीत, ही परिस्थिती. ‘जुनी खोडंआणि त्यांचं बारा महिने बत्तीस काळ सोबत असलेलं दारिद्र्य- हेच काय ते उदंड शिलकीत पडलेलं. वर्षानुवर्षे असलं पिचत आयुष्य काढल्यानं, मूळच्या कोमलतेला आलेली भाषेची कडवट किनार, आताशा शरीराचा एक भागच बनलेली. अशा अनेक सजीव(!) पात्रांना एकापाठोपाठ एक, आपल्याला या कादंबरीत भेटता येतं. ‘रया जाणंकिंवा बडा घर पोकळ वासाया म्हणी नव्याने कळू लागतात. ‘कालचक्रहे खरच एवढं ताकदीचं कसं असू शकतं- असा विचार सुद्धा मनाला कुठेतरी शिवून जातो.

एका प्रदीर्घ काळानंतर घरी येत असलेला आपू, जेंव्हा कोकणच्या पहिल्या किनाऱ्याला येऊन पोहचतो, तेंव्हा त्याला बालपणीच्या आठवणीचे ढग जणू घेरू लागतात. त्या खेळकर, अल्लड, रडक्या वयातल्या आठवणी. अजुनही सारं कसं स्पष्ट, डोळ्यापुढून सरसर पुढे जात असलेलं. काहीश्या कारुण्यरसात गुंफलेल्या बासरीच्या स्वरांनी

एका विलक्षण भावनिर्मितीची नांदीच जणू होते आणि आपणही आपूसोबत प्रवासाला निघतो. “मुंबई सोडल्यापासून मनात सारखे मृत्यूचे विचार येत होते…!”- लेखकाचे (अर्थात आपूचे) घरी निघाल्यावर मनात आलेले हे विचार. घरी, गावी सगळं ठीक असेल ना?.. की काही..!- अशा विचारांनी येणारी त्याची अस्वस्थता इथे स्पष्ट दिसते. खोतांचा पोर असलेला आपू मुंबईहून सुटीला घरी येणार म्हटलं की, एकेकाळी तो सगळ्या कुटुंबासाठी उत्सवच असायचा. मग घरची माणसं काय अन् घरगडी-सालदार काय, सगळ्यांनाच त्याचा विशेष आनंद. आई, आबा, आज्जी, नाऱ्या गडी, झीलू केदार इतकंच काय पण भटजी बुवा- असे झाडून सारे मग इथं हजर. ही गोड आठवण मनातून जाऊच नये, असं वाटतांनाच आपू ची नाव त्याच्या गावच्या किनाऱ्याला लागते. मात्र आज त्याला घरी घेऊन जायला, त्याचं हर्षभरल्या तोंडाने स्वागत करायला कुणीही नाहीये. सुरुवातीलाच हा गावापासून तुटल्याचाअनुभव घेत आपू आणि आपण श्रोते सुद्धा घराकडे निघालेलो. आधीसारखं आता काही राहिलेलं नाही- हे सांगण्याचा हा दळवींचा खरोखरच मन हेलावणारा प्रसंग! “घरात वस्ती नसली, म्हणजे पाली सुद्धा घर सोडून जातात“- यासारखी वाक्य म्हणजे तर ललित लेखनाला दिलेली एक वास्तववादाची जोडंच म्हणता येईल.

महत्वाचं हे आहे की, दळवींनी यातली कुठचीही गोष्ट हेतू पुरस्सर निर्मिलेली किंवा त्यांच्या समर्थ लेखणीचा आधार घेत मांडलेली नसून, केवळ निरीक्षणांवर आणि त्यानंतर मनात आलेल्या विचारांवर विसंबून लिहिलेली आहे. सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे हास्यपेरणीचेप्रसंग सुद्धा यात अनेकवेळा आल्याचं दिसून येईल. वानगीदाखल सांगायचंच झालं तर, लेखकाचा पहिल्यांदाच शाळेत जाण्याचा प्रसंग असेल, त्याच्या पूर्णपणे इंग्रजाळलेल्याबागाईतकर मास्तरांचं प्रकरण असेल (विशेषतः त्यांनी म्हटलेलं- “अंगविक्षेप करत म्हणायचे चेंडूचे गाणे‘ ” असेल किंवा मग गावच्या रवळनाथाच्या मंदिराचा दादू गुरव, याने बसवलेलं द्रौपदी वस्त्रहरण हे नाटक आणि त्यात स्त्री पार्टीम्हणून स्वतःच द्रौपदी साकारणाऱ्या दादूचंच झालेलं विनोदी वस्त्रहरण असेल- असे कित्येक प्रसंग आपल्याला निश्चितपणे हसवतात देखील. या प्रत्येक प्रसंगाला साथ मिळालीय, ती तितक्याच खळखळाटउडवून देणाऱ्या गमतीदार संगीताची. पण मग पुन्हा एकदा जेंव्हा, बंडखोर सत्याग्रही पण परिस्थितीपुढे नंतर वाकावं लागलेला नरूकिंवा काहीसा अबोल-स्वमग्न आणि आपल्या आग्रही निसर्गप्रेमापायी लोकांच्या चेष्टेचा विषय झालेला हाफमॅडतात्या रेडकर, ही मंडळी समोर येतात; तेंव्हा श्रोते पुन्हा एकदा त्या कातर भावनांत गुरफटले जातात. आपल्यापैकी बहुदा प्रत्येकाला, अशा हळव्या अनुभवांना कधीतरी सामोरं जावं लागलेलं असतं. लेखकाला हेच तर यातून दाखवून द्यायचं नसेल?

खरं तर दळवींनी उभ्या केलेल्या प्रत्येक पात्राविषयी बरंच काही लिहिता येईल. पण प्रश्न प्रत्येक पात्र किंवा त्याची वेगळी ओळख करून देण्याचा नाही. असलाच तर प्रश्न आहे त्यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितींचा. कधी निसर्गाने तर कित्येकवेळा माणसानीच अनुभवायला दिलेल्या परिस्थिती. म्हणूनच की काय, ही स्नॉव्हेलऐकल्यावर काही वेळ आपण सुन्न होवून बसतो. ठोस आणि ठळक अशा अनुभवातून उभी झाली असल्याने सारे प्रवासी..’ ला एक चुटपुट लावून जाणारा खरेपणा आहे. “अशी एकेक माणसं. जगावेगळी जगली. जगावेगळी मेली. भरड्या जमिनीत जन्मली आणि मुरमासारखी खडबडीत राहिली. घशात कोरड आणि ओरड हेच जीवन असलेली ही माणसं.”- ही वाक्य म्हणजे, माणसांचं दुःखात मूरणं काय असतं, हे दर्शवणारी उदाहरणंच नाहीत का!

कोकण काय पण एकूणच आसपास होऊ घातलेल्या (आणि खरं तर झालेल्या) सामाजिक- सांस्कृतिक- आर्थिक बदलांची ही चित्तरकथा ऐकणं, म्हणजे स्वतःला एका निःशब्द सुरावटीने वेढून घेणंच आहे, हे निश्चित!

Leave a comment