शितू

मराठी भाषेला अनेक थोर लेखक-कवींची साहित्यिक परंपरा लाभलीय. अर्थात, असे असतानाही साहित्य-कला-संस्कृतीयाला एक वेगळे परिमाण देत, त्यातून आयुष्याचे एक जीवंत आणि अगदी कुणाशीही सहज जोडले जाणारे लेखन करणारी, काही ठराविकच माणसं त्या-त्या काळात बघायला मिळतात. कथा-कादंबरी या वाङ्मय प्रकारांत आपल्या रसाळ लेखणीने मोलाची भर टाकणारा असाच एक माणूसम्हणजे गोपाल नीलकंठ दांडेकर- अर्थात गोनीदां! स्वैर, मनस्वी भ्रमंतीतून, निसर्गाच्या सहवासातून मिळवलेले विविध जीवनानुभव त्यांच्या लेखणीत ठिकठिकाणी पेरलेले आढळतात. धर्म-संस्कृती आणि इतिहास यांत विशेष रमणाऱ्या गोनीदांनी विविध प्रकारची शंभरहून अधिक पुस्तके लिहिली. यांतीलच एक- कादंबरी..किंवा मग गोष्ट..किंवा मग व्यक्तिरेखा- म्हणजे शितू‘. गोनीदांची मानसकन्या शितूअडीच वर्षांच्या प्रसुतीकाळानंतरजन्मलेली शितूवाचणाऱ्या प्रत्येकाचे हृदय हलवून टाकणारी शितू…!

लिखित साहित्याचे श्राव्य माध्यमात केलेले रूपांतरण‘- अशी इनोव्हेटिव्ह संकल्पना घेऊन स्नॉवेलने जेव्हा मराठीतील निवडक पण दर्जेदार अशा साहित्यकृतींना हात घालायचे ठरवले, तेंव्हा कुणाच्याही मनात अशी पक्की खात्री नसेल की, या संपूर्ण प्रक्रियेचे फायनल प्रॉडक्ट सुद्धा तेवढेच स्वागतार्ह असेल म्हणून. परंतु, ‘स्नॉवेलने सुरुवातीस विमोचीत केलेल्या काही ध्वनिमुद्रीकांपैकी एक असलेली शितूऐकल्यावर या विधानाची पुरेपूर प्रचीती आल्याशिवाय राहत नाही. “एक यशस्वी आणि येणाऱ्या काळात अपेक्षा वाढवणारा प्रयोग“- असे इथे म्हणणे अनुचित ठरणार नाही.

आज जवळपास पन्नासहून जास्त वर्षे झाली गोनीदांची शितू वाचकांच्या हाती पडायला. मग अशी कोणती बरे गोष्ट असावी, की ज्यामुळे ही शितू अगदी आजच्या काळातही कित्येकांना जवळची वाटते, त्यांना हळवी करते?…असं म्हणतात- काळ बदलला की माणूस बदलतो. त्याची जगण्याची तऱ्हां बदलते. वरवर अगदी सत्याचे कथन करणारे हे वाक्य, माणसाच्या माणूसपणाबद्दल मात्र कुठला उल्लेख करताना दिसत नाही. नेमके हेच माणूसपणकारणीभूत असावे- की ज्यामुळे काळ बदलला तरी, या माणूसपणाचे वास्तव चित्रण करणारी शितूआजही हृदयाचा ठाव घेताना दिसते. एका प्रतिभासंपन्न लेखणीतून निर्माण झालेली शितू, तिच्या काल्पनिकअसण्याच्या मर्यादा एका झटक्यात उल्लंघून, प्रत्येकासाठी ती वास्तवात घडलेली एखादी सत्यकथाच आहे- अशी भावना ठेवून जाते, ती त्यामुळेच! अगदी एखाद्या कथेबद्दल सांगायचे, तसे सांगायचे झाले तर- ‘शितू‘, ही शितू नावाच्या एका मुलीची, तिच्या आयुष्याची कहाणी आहे. एक सात्विक वृत्तीची बालविधवा शितू आणि बेदरकार वृत्तीचा, पण प्रेमळ अंतःकरण असलेला विसू, यांच्या विफल प्रीतीची ती करुणोदात्त अशी शोकात्मिका आहे. शितू वाचताना..किंवा आता स्नॉवेल च्या ऑडिओ-बूक च्या रूपात ऐकताना एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे शितुचा काळासोबत होत जाणारा एक प्रवास. टप्प्या-टप्प्याने अन वेगवेगळ्या प्रसंगांमधून हा प्रवास आपल्यासमोर उलगडतो. यात असलेले प्रत्येक पात्र हे त्याच्या एका स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाने समोर येते. जणू आपल्याशी थेट संवादच साधते. मूळ कादंबरीची जीवंत रचना- हा पुनरुल्लेख टाळता येणे शक्य नसतानाच एक तेवढीच महत्त्वाची बाब नमूद करणे येथे गरजेचे ठरते- ती म्हणजे अभिवाचनाच्या रुपांतरणामुळे त्या प्रत्येक पात्राला मिळालेली नवी, मूर्त ओळख. आणि हे खरे सुद्धा आहे. माणसाच्या जाणिवांच्या पातळीवर आवाजकिंवा ऐकणेया गोष्टीचे केवढे अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे वेगळे सांगायला नको. कुठल्याही गोष्टीकडे लक्ष वेधताना, कानोसा घेताना, ‘या मनीचे गुज त्या मनीकळवताना थोडक्यात आदान-प्रदान करताना आपल्या मूलभूत जाणिवांच्या शक्य तेवढ्या जवळ जाणारे साधन म्हणजे ध्वनीआवाज. म्हणूनच शितूसारखा मूळचाच जीवंत ऐवज, आवाज मिळाल्यानंतर एका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचतो. कुठल्याही कष्टाविना, प्रत्येक पात्र श्रोत्याच्या थेट कानांतून मनांतजाऊन बसते! म्हणूनच त्या अर्थाने अभिवाचन हा एक अभिरुची अधिक संपन्न करणारा अनुभवही ठरतो.

आता हा संपन्नतेचा अनुभव श्रोत्यांपर्यंत कसा भिडतो हे जाणणे अगत्याचे आहे. कलाकृतीची रसवत्ता ही तिच्या उत्कटतेशी सख्य साधणारी असते- असे मानले तर, या कादंबरीत ते अनेक अंगानी घडताना दिसते. जसे सूर आणि कणसूर, यांत असलेले अंतर जाणत्याकानास सहन होऊच शकत नाही..तसेच एखाद्या संहितेत पात्रांची केलेली विजोड निवड, ही कुणाही श्रोत्यास खिळवून ठेवू शकत नाहीत. सदर अभिवाचनात याची यथोचित काळजी घेतल्याचे दिसते. त्याचेच प्रत्यंतर म्हणून- फक्त शितूच नव्हे, तर विसू, आप्पा, सदू किंवा मग भागुकाका देखील आपल्या घरातले वाटू लागतात. निःशंकपणे याचे श्रेय जाते ते- वीणा देव, विजय देव, रुचिर कुलकर्णी आणि मधुरा डहाणूकर यांना! कलाकाराला पात्राची प्रवृत्ती अन प्रकृती पुरेशी व्यवस्थित समजलेली असली की, मग त्याच्या वाचेतून हव्या त्या आणि हव्या तशा भावना उध्रुत होऊ लागतात. अशा वाचिक अभिनयाचा सुद्धा एक चिंब-अनुभवयेथे मिळतो. या अनुभवाला जोड मिळतिये ती येथे वापरलेल्या भाषेची. ‘आपलीच असलेली पण आजच्या काळात कानावर यायला दुर्मिळ‘- अशा मराठी भाषेचे आणि काही अनवट शब्दांचे श्रवण या निमित्ताने होणार आहे. मराठी भाषा किती म्हणून ऐकायला गोड आणि त्या गोडीत नखशिखांत डुंबू देणारी (अतिशयोक्ती नाही!) असू शकते- हे शब्दांत कसे काय सांगता येईल!

शितू बद्दल चर्चा करताना, एक काहीशी उशिराने जाणवणारी पण संपूर्ण अभिवाचनात सतत आपल्या सोबत असणारी गोष्ट म्हणजे कोकण. मानवी नाती, त्यांतील तरलता, व्याकुळता याचे ठायी ठायी दर्शन घडवणाऱ्या शितूसोबत आपल्याला तेवढ्याच उत्सुकतेने- प्रेमाने भेटायला येणारे कोकण! या संपूर्ण उपक्रमात कधी कोकणचा निसर्ग, कधी तिथला माणूस, तर कधी कोकणचो मायबाप दर्या‘- अशा रूपांत ते आपल्या समोर येते. गोनीदांची सशक्त निरीक्षणशक्ती, माध्यमांतर करताना केलेले उत्कृष्ट ध्वनी संयोजन आणि भाषिक डौलावर असलेली कलाकारांची हुकुमत- याने ते होऊ शकले असावे. “शितूला कोकणच्या संस्काराची साजलेणी लेवविली आहे“- हे खुद्द गोनीदांनी लिहून ठेवलेय. या संपूर्ण कादंबरीचा सार आणि त्या भावनोत्कटतेचा एक परिपाक, हा गोनीदांच्या प्रस्तावनेत वाचायला मिळतो. सदर अभिवाचनात ती असती तर खूप बरे झाले असते. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बासरी, तबला/मृदुंगा सारखी वाद्ये आणि प्रसंगी अगदी शांततेचाही एक विलक्षण आवास‘, संवाद घेतानाचे आवाजातील कंप- अशा सगळ्याच गोष्टी मूळ अनुभावास अधिकच समृद्ध करणाऱ्या!

एकूणच शितू अनुभवल्यावर एक गोष्ट अगदीच कळते- ते म्हणजे तिचे कारुण्याने भरेलेले असणे. पण मग या अशा वेदनांनी संपृक्त असतानाही ती पुन्हा-पुन्हा का बरे वाचावी-ऐकावी वाटत असेल? एवढे समरसून जाण्यासारखे काय बरे असावे त्या रडण्यात?.. उत्तर शोधणे कठीण आहे. कदाचित कलाकृतीच्या चरमोत्कर्षाकडे जाणारा प्रवास अशा वेदनांनी भरलेलाच असावा. शितू लिहून गोनीदांनी नक्की काय केले असा अजून एक प्रश्न आपणांस पडू शकतो. कुणी म्हणेल त्यांनी भाषेचे वैभव मांडलेकुणी म्हणेल त्यांनी कलात्मकतेची रूपे दाखवलीकुणासाठी ती प्रेमगाथा तर कुणामते ते समाजातील आनंद-दुःख चित्रित करण्याचा यत्न. अंदाज काहीही असोत..ही शितू ऐकून अनेकजण एकेकटे हसतील, रडतील, आत्ममग्न होतील हे मात्र निश्चित!

Leave a comment