समुद्र

नात्यांचं समुद्रमंथन-

मानवी समाजव्यवस्था म्हटली म्हणजे त्यात पुरुष आणि स्त्री हे दोन प्रमुख घटक आले. निसर्गाने घडवतांनाच शरीर आणि भावना अशा दोन्ही स्तरांवर सो सिमिलर येट सो डिफरंटअसं घडवलेले हे दोन घटक. (ढोबळमानाने) असं मानता येईल की, वरवरचा आणि आतला माणूसकसा आहे हे पुरुषांच्या बाबतीत समजायला विशेष काही कष्ट पडत नाहीत. बऱ्याचशा प्रमाणात पुरुष असतातच मुळी चटकन अंदाज यावा असे, एखाद्या खुल्या किताबसारखे. पण मग स्त्री चं काय? ती असते का तशी?… सामान्यतः तरी याचं उत्तर नाही असं आहे. खूप काही प्रयत्न केला तरीसुद्धा तिच्या मनाचा तळ हाती लागेलच, असं काही ठामपणे कुणी सांगू शकत नाही. अनाकलनीय, अगम्य अशी ती! तर असे हे दोघं‘, साहित्यातून उदंड वेळेला रसिकांच्या भेटीला (वेगवेगळ्या भूमिकांतून) येत राहिले आहेत. मानवी समाजव्यवस्था, नातेसंबंध, त्यांची मूल्यांशी असणारी बांधिलकीसंस्कृती, नैसर्गिक भावभावना, माणसांनी (स्वतःसाठी) ठरवून घेतलेल्या काही चालीरीतीअसे अनेक, एकाच पातळीवरचे पण तरीही खूप गुंतागुंतीचे विषय आणि सोबतीला हे दोघं. त्यातही, या संबंधांत सगळ्यात जास्त साहित्यरुची जोपासणारं नातं म्हणजे नवरा-बायकोचं. मिलिंद बोकिलांची छोटेखानी कादंबरी समुद्र‘, असंच एका जोडप्याचं नातं आयुष्याच्या विशिष्ट टप्प्यावर उलगडतांना दाखवते. ‘स्नॉवेलतर्फे तयार झालेली या कादंबरीची ऑडीओ बुक नुकतीच ऐकायला मिळाली, त्यानिमित्त हा लेखनप्रपंच.

या ठिकाणी दोन गोष्टी सुरुवातीलाच नमूद करणं गरजेचं. पहिली म्हणजे बोकिलांची ही कादंबरी जरी नवरा-बायकोची असली तरी, ती कुठल्याही ठराविक वैचारिक दिशेने मुद्दामहून जाणारी नाही. तिचा संपूर्ण प्लॉट हा लेखकाच्या त्रयस्थ-तटस्थ अशा लेखणीतूनच मांडला गेला आहे. याचा महत्वाचा फायदा वाचकांना आणि आता अर्थातच श्रोत्यांना असा होणार आहे की, या उपक्रमातून नात्यांकडे बघण्याचा एक स्पष्ट आणि स्वच्छ दृष्टीकोन समोर येऊ शकणार आहे. कुठलाही पूर्वग्रह याठिकाणी (निदान शेवटापर्यंत पोचतांना) टिकत नसल्याचं जाणवेल. दुसरी गोष्ट म्हणजे या लिखित कादंबरीचा तितकाच किंवा अनुभवाच्या पातळीवर म्हणायचं झालं तर, काकणभर वरचढ असा परिणाम त्यातील पात्रांना मिळालेल्या आवाजांनी निर्माण झाला आहे. (अर्थात हा प्रत्येकाचा व्यक्तिगत अनुभव असण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच दोन्ही कलाकृतींची तुलना सुद्धा इथे अपेक्षित नाही.)

तर बोकिलांची समुद्र ही कादंबरी म्हणजे मघाशी म्हटल्याप्रमाणे, जगातील चालीरीतींनुसार कदाचित सर्वात जास्त काळ एकत्र घालवणाऱ्या नात्यावर आधारलेली आहे. अर्थातच यात प्रमुख पात्र दोनच आहेत. नंदिनी आणि भास्कर. वयाच्या अन् लग्नाच्या निम्म्याअधिक टप्प्यावर आलेली ही दोघं. म्हटला तर कुणालाही हेवा वाटावा असा संसार. भास्कर एक प्रथितयश उद्योजक. आयुष्यात सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे जश्या च्या तश्या घडवलेला आणि सोबतच आयुष्याला एक सुबक आकार दिलेला असा हा भास्कर. कुणाच्या विशेष अध्यात-मध्यात नसणारा. बायको- मुलावर प्रेम. इतरांसारखीच पुरुषम्हणून असणारी कर्तव्यआणि हक्कनिभावत जाणारं एकरेषीय जगणं. एकूण सारं कसं टापटीप. दुसरीकडे नंदिनीगृहिणी गटात चपखलपणे बसणारी ही बाई. नोकरी करता येण्यासारखी, पण ठरवून स्वतःहूनच घरी राहणं पसंत केलेली नंदिनी. वाचनाची तिला भारी आवड. नवऱ्यावर मनापासून प्रेम. तो म्हणेल तसं सगळं ऐकण्याची नेहमीच तयारी. त्याची सक्ती आहे म्हणून नव्हे, तर त्याला समर्पित असल्यामुळे असं करणारी. असं सारं असतानाही बऱ्याचदा स्वतःतच गुंतून राहणारी, मनस्वी नंदिनी! एकदा ही दोन्ही काल्पनिक पण वास्तववादी पात्र व्यवस्थितपणे उभी राहिली की, एकूण आपला श्रवणप्रवास कुठच्या दिशेने होत जाणारे याचा अंदाज आपण बांधू लागतोआणि एवढ्यात एका अवघड वळणावर बोकील आपल्याला आणून सोडतात. बघू बरं- कसं बाहेर पडतात तुम्ही यातून- असं काहीतरी म्हणत असल्यासारखे. आयुष्य तरी याहून कितीसं वेगळं आहे?

-“बऱ्याच दिवसांत जमतच नाही म्हणून राहतं, पण ह्यावेळेस मात्र खास- आपल्या दोघांसाठीच असा मनसोक्त मोकळा वेळ काढायचा“, असं ठरवून समुद्रकिनारी सुट्टी घालवायला म्हणून आलेले नंदिनी-भास्कर. सहजीवनाच्या या टप्प्यावर एकमेकांच्या वागण्याचा, स्वभावाचा पुरेसा अंदाज आलेली ही दोघं. ज्याची त्याची स्पेसराखून असलेली आणि तिचा आदरसुद्धा बाळगणारी. का कुणास ठाऊक, पण दोन-पाच दिवस समुद्रावर निवांत घालवायला आलेल्या या दोघांच्या मनात मात्र पुरेशी शांतता दिसत नाही. काय बरं झालं असेल- आपल्यातील अनेकांना प्रश्न पडलेला. (इथं बोकिलांच्या लेखणीला खरंच मानलं पाहिजे. छोटे छोटे संवाद आणि त्यांत विसावणारे अस्वस्थ विराम यांचा आगळाच मेळ इथे ऐकायला मिळेल.) वर म्हटलेल्या वाक्यात पुरेसा अंदाजअसे शब्द आहेत. यांत अंदाजहा अधिक महत्वाचा शब्द. अंदाज म्हटला की तो कधीतरी चुकण्याची एक शक्यता तरी नेहमीच राहते. हीच शक्यताआपल्या पात्रांच्यात सारं काही आलबेल नसण्याला कारणीभूत असल्याचं श्रोत्यांना समुद्रच्या पुढच्या टप्प्यावर कळतं. शांत असणाऱ्या समुद्रात एखादं वादळ अचानक यावं अन् त्याने सारे काही हलवून टाकावं, असंच काहीतरी या दोघांच्या आयुष्यात नंदिनीने दिलेल्या एका कबुलीने घडून जातं. भास्करला किंवा कुणाही नवऱ्याला कधीही ऐकावीशी वाटणार नाही, अशी ती कबुली!

कितीही बरा-वाईट असला तरी एखादी गोष्ट कन्फेसकरण्यातला अनुभव हा महत्वाचा खासंच! नात्यांमधील विश्वासाचा पापुद्रा अधिक घट्ट करणारा. कादंबरीचा एका अर्थाने निम्म्याहून अधिक प्लॉट हा या घटनेशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सतत जोडलेला आहे. एरव्ही अशा प्रकारच्या विषयांवरचे साहित्य किंवा नाटक-चित्रपट हे भरकटण्याची शक्यता खूप. कारणं आणि परिणाम यांत नेहमीच कारणांकडे होणारं दुर्लक्ष बघायला मिळतं. ‘समुद्रसुदैवाने याला अपवाद आहे. प्रत्येक गोष्टीचं एक ठोस असं उत्तर यात दिलेलं दिसतं. सुरुवातीसच म्हटलं तसं, कादंबरीच्या पात्रांत वाचक-श्रोत्यांनी गुंतणं अपेक्षित आहे; लेखकाने नाही. अगदी असंच ताटस्थ्य स्विकारून समुद्रबनली आहे. अधिक सोप्या (की कठीण) शब्दांत मांडायचं तर, इतर कुठच्या रुढींचा-रीतींचा नव्हे तर बुद्धीप्रामण्याचा डोळसचष्मा लावलेली ही कादंबरी!

नंदिनी अर्थात नंदूचं तुटक, कुठल्याही गोष्टीत स्वतःहून पुढाकार नं घेण्याचं वागणं, खुलून नं बोलणं भास्कर ला आवडत नाही. आपल्याला जे काही वाटतं ते समोर स्पष्टपणे बोलून टाकलं पाहिजे, असं मानणारा आपला हा नायक. याच्या अगदी उलट, ‘मनातलं नं सांगताच समजून घेणारं आपलं माणूस असावंअसं नंदिनीला हवंय. म्हटलं तर सुखात पण तरीही काही मिसिंग असण्यासारखं यांचं प्रकरण. नीट बघितलं तर आपल्याही आजूबाजूला दिसतील ही दोघं. कित्येकवेळा तर काही श्रोत्यांचं ते आत्मनिवेदन देखील ठरू शकेल. विषयाला हात घालताना आधी अनेक गोष्टींची जणू एक जंत्रीच बोकील उभी करतात. वातावरण निर्मितीची ही एक शैलीच. आपले दररोजच्या वापरातले शब्द ते वापरतात. त्यामुळे लेखक आणि वाचक असा अंतराचामामला इथे नसून, दोन जणांच्या गप्पांएवढी जवळीक यात जाणवते. “घरात आता दोघेच दोघे असतो. सारखं तरी एकमेकांशी काय बोलणार? ती तिच्या नादात- आपण आपल्या…”- अशी अनेक वाक्य त्यांच्या- विषयात अलगदपणे शिरण्याच्या शैलीची प्रचीती देतात. नंदिनीचे कुणा दुसऱ्या पुरुषासोबत काही काळासाठी एकत्रयेणे, या घटनेतून नैतिकता, विवेक, शरीरशुचिता आणि मनाची गरज, एकसारख्या आवडी-निवडीच्या व्यक्तीबद्दल वाटू शकणारे साहजिक आकर्षण- अशा अनेक विषयांना लेखक समोर आणतो. व्यभिचार म्हणून जे काही असतं, ते वाईटअसं ज्या युक्तिवादाने पटवून देता येतं तो युक्तिवादच संपला तर…? मग आपोआपच या निसर्गदत्त गोष्टींना पावित्र्याशी जोडण्याची गल्लत होणे थांबेल. त्या-त्या वेळची भावनिक समज आणि सामाजिक भावना यांतील द्वंद्व दुसरं ते काय?..आदिकालापासून असलेल्या एका सार्वत्रिक प्रश्नाला समुद्रसमर्थपणे हात घालते..त्याची उकल शोधण्याचा प्रयत्नही करते.

समुद्रसारखा विषय हा मुळात समाजाची रूढ चौकट मोडीत काढणारा आहे. अशा या वेगळ्या कादंबरीला दिग्दर्शित करतांना, अनिरुद्ध जोशी यांनी दिलेली संयत ट्रीटमेन्ट ही वाखाणण्याजोगीच आहे. संपूर्ण कथानक हे अपेक्षेप्रमाणे सतत वेगवेगळ्या मूड्स वर घडवत ठेवतांनाच, केवळ आवाजाच्या साहाय्याने हा पट डोळ्यांसमोर उभा करण्यात ते यशस्वी ठरलेत. पाठीमागे सतत असणारा समुद्राचा एक आवास आणि आवाज (गाज), बदलत जाणाऱ्या संवाद अन् भावनांसोबत स्वतःही बदलत जाणारे पार्श्वसंगीत- त्यातही जलतरंग सारख्या वाद्याचा साधला जाणारा परिणाम, अशा सर्व गोष्टी बोकिलांच्या निरीक्षणांएवढ्याच महत्वाच्या! नाटक किंवा सिनेमात पार्श्वसंगीताकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. याच पार्श्वसंगीताची बलस्थाने ऑडीओ बुक मुळे मात्र ठळकपणे पुढे येतांना दिसतात. या समुद्रातीलनावेचे सुकाणू खऱ्या अर्थाने ज्या दोघांच्या हातात आहे ती दोघं- अर्थात केतकी सराफ (नंदिनी) आणि शशांक शेंडे (भास्कर) यांनी शब्दांना जिवंत मानवी रूप दिलंय. दोन्ही पात्रांची वैशिष्ट्ये आणि महत्वाचं म्हणजे- वैचारिक प्रगल्भता ही दोघं आवाजातून साभिनय उभी करतात. विशेषतः केतकी सराफ. नंदिनीच्या आयुष्यात घडून गेलेल्या त्या गोष्टींचं तिच्यालेखी असलेलं तात्कालिक महत्त्व, घडलेलं भास्करला खरंखरं सांगतांना असलेली तिची सहजता, नंदिनीच्या मनात असणारी भास्करची उंच प्रतिमा आणि मनापासून असलेलं प्रेम- हे सारंच केतकीने अत्यंत समजेने केल्याचं जाणवतं.

एकमेकांना समजावून घेऊ इच्छिणाऱ्या, नातं अधिक मोकळं करू बघणाऱ्या प्रत्येक कपलने ऐकायला() हवी अशी ही कलाकृती म्हणता येईल. शेवटी लेखकाच्या शब्दांतील भास्करचं हे वाक्य-

…”इतकी वर्षं समुद्र पाहिला पण आता पहिल्यांदाच हे लक्षात आलं आपल्या की लाटा म्हणजे समुद्र नाही. लाटा हा केवळ पृष्ठभाग आहे. खरा समुद्र निराळा आहे. तो दिसत नाहे, फक्त जाणून घेता येतो. ढग येतात, पाऊस पडतो, वादळे उठतात, तारे तुटतात, गलबतं लहरतात; या सगळ्या वरवरच्या गोष्टी आहेत. समुद्र आतमध्ये जसा आहे तसाच आहे; स्थिर, अविचल.”

Leave a comment